Disable right click

Saturday, 12 July 2014



जर्मनीला येण्याची प्रत्येकाची आपापली कारणं असू शकतात. आमच्या दृष्टीने बहुतांशी हा सगळा रोमॅंटिझमचा भाग होता. युरोपात दोन वर्षं राहणं, शक्य तितका तो फिरून पाहणं, हे आमच्या एकूण जर्मन आकर्षणाचं मूळ होतं. पण इतकी राजविलासी कारणं प्रत्येकाच्या नशिबात दुर्दैवाने लिहीलेली नाहीत. सुंदर, प्रगत, प्रचंड काहीतरी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला आणि शिस्तप्रिय वगरे या इतरांप्रमाणे तितपतच गबाळ्या कल्पना मनात घेऊन आम्ही आलेलो. हे सगळं इथे चौवीस तास आहेच पण निव्वळ याच गोष्टींच्या आकर्षणापोटी इथे न आलेल्या कितीतरी लोकांसोबत माझी बेमतलब उठबस होऊ लागल्यापासून, सगळ्याच गोष्टींचा अर्थ हळूहळू बदलत चाललाय.

लिश्तेनाऊ मधल्या आमच्या घरात गेल्या आठवड्यापासून नवीन मुलगा रहायला आला. हलील आधीपासून होता. आमची काही गोष्ट नाही. आमची अशी काही गोष्ट होऊ शकत नाही. पण अलीच्या आणि हलीलच्या जगण्याला आणि इथे असण्याला काही पार्श्वभूमी आहे. डोळे मिटले आणि इथे येऊन पोहोचलो, इतकं सोपं सगळं नाही.

तीस चाळीस वर्षांपूर्वी खाणीवर काम करायला म्हणून जर्मनीने बाहेरच्या लोकांना आपली दारं उघडी केली, आणि कितीतरी संख्येने सगळ्यांसोबत टर्कीश लोक इथे येऊन स्थायिक झाले. कोण जर्मन आणि कोण टर्कीश इतपत परिस्थिती आता कधीकधी जाणवते. त्यांची दुसरी पिढी इथे जन्मलीये. आता इतक्या वर्षांनंतर कोणे एकेकाळची गरज संपल्यामुळे, जर्मन लोकांना टर्कीश लोक आवडतातच असं नाही. हलील आला त्या दिवशी ओरहान पामुकच्या देशातला म्हणून मला त्याचं विशेष कौतुक वाटंत होतं आणि उलट्पक्षी त्याने, तू रवीशंकर ऐकतोस का? असं विचारून मला चकित केलं होतं. त्याच्या आणि माझ्या आवडीनिवडी बयाच अंशी जुळतात. पण तो टर्कीश नाही. तू कूर्द आहे. त्याच्या या कुर्द असण्याला बराच अर्थ आहे. टर्कीत कुर्दीश लोकं अल्पसंख्यांक आहेत आहेत आणि त्यांना मानसम्मान वगरे नाही. त्यांच्यासाठी ते उपरे आहेत. त्यांची भाषा वेगळीये. फक्त टर्कीतच नव्हेत तर इराक, इराण आणि सिरिया मध्येही हे कुर्दीश लोकं हेटाळणीचा विषयच आहेत. आता या सगळ्याच देशांतल्या काहीकाही भूभागावर, जिथे ते मोठ्या संख्येने रहातायत, तिथे त्यांना कुर्दीस्तान स्थापन करायचाय. त्यासाठी लपून छपून आणि काही ठिकाणी उघडपणे लढाई चाललीये. अस्तित्वात नसलेल्या अशा या देशाचा झेंडा, नकाशा वगरे अशी सगळी तयारी कधीचीच झालेली आहे. सदाम हुसैनने इराकमधून त्यांचा बिमोड करण्यासाठी एके काळी रासायनिक अस्त्रांचा वापर केला, ज्यात पाच हजाराहून जास्त लोक, लहान मुलांसकट वाईट तर्हेने मेले. कित्येक हजार जखमी आणि नंतरच्या परिणामांना कायमचे बळी पडले. हलील तिथे राहिला असता तर त्याला विनापर्याय टर्कीश सैन्यात भरती व्हावं लागलं असतं, जे कुर्दांच्या विरोधात कायम लढण्याच्या पावित्र्यात असतं. त्याचा स्वभाव फ़ार गुंतागुंतीचा आहे. आम्ही बरेचदा या सगळ्यावर बोलत बसलेलो असतो आणि त्याला त्याच्या स्वतःच्या लोकांबद्दल जे वाटतं, त्याच्या एक दशांशही आपल्याला आपल्या लोकांबद्दल वाटंत नाही, याची मला उघड उघड लाज वाटते.

अली काल परवा आमच्यात रहायला आलेला मुलगा. तो सिरियन आहे. लहान आहे. चिक्कार बडबड करतो. विलक्षण हसतमुख असतो. सिरियातल्या असादच्या राजवटीला कंटाळून त्याचं पूर्ण कुटूंब आधी काही महिने इजिप्तला आणि नंतर तिथून इस्तांबूलला रहायला गेलं. रहायला गेलं याचा अर्थ इथे, सिरियातून पळून दुसया देशांच्या आश्रयाला गेलं. शेवटी तो इकडे जर्मनीत शिकायला आला. मधली कित्येक वर्षं तो शिकलेलाच नाही. सिरियात आतापर्यंत जवळपास वीस हजार लोक या असादच्या लोकांनी मारलेयत. त्यात त्याचे सख्खे दोन मोठे भाऊही गेले. त्यातला एक डॉक्टर होता. अली तिथे राहिला असता तर तोही मेलाच असता. सिरियात त्याचं आता काहीही राहिलेलं नाही. जिथे घर होतं तिथे आता काही नाही. त्याचा पासपोर्ट संपायला आलाय, तो रीन्यू करायचा तर सिरियात परतावं लागेल, जे आता अशक्य आहे. सिरियात जायला त्याला थोडक्यात आता काहीच कारण उरलेलं नाही. तो म्हणत राहतो, की तुला काय कळणार, की मी काय गमावलंय? परत जायला कुठली जागाच नसणं म्हणजे काय हे तुला काय कळणार? हे अगदी खरं. त्याचे वडील अरेबिकचे इस्तांबूलमध्ये प्रोफ़ेसर आहेत आणि शेंडेफळ म्हणून त्यांनी त्याला बराच लाडाकोडात वाढवलेला आहे. तो स्वतःच म्हणतो की त्याचं डोकं फिरलेलं आहे.


आणि ओल्हा. ती मूळची युक्रेनची. ती कधीच काही म्हणत नाही. अगदी मनापासून हसताना मी तिला फार क्वचित पाहिलंय. प्रचंड काहीतरी मनात घेऊन ती समोर उभी असते. आपल्यामागे आपण जिथून आलोय, त्या जागेचं काहीबाही होतंय आणि त्यावर कुणाचंच काही नियंत्रण राहिलेलं नाही, हे पटवून घेणंही किती विचीत्र असावं. काही माणसं आपल्या मनात रुतून बसतात. त्यांच्याबद्दल विचार करणं तुम्ही थांबवूच शकत नाही. त्यांच्या दुःखाचे तुम्ही तुमच्यापुरते भागीदार होऊन गेलेले असता. आपण कारण नसताना वेगवेगळ्या गोष्टींना मनाने जोडले जातो. एक्स्पोजरचा हा अर्थ आम्ही कधी ध्यानातच घेतला नव्हता.


कितीतरी लोकांना व्हाईस न्यूज हे प्रकरण अजूनही ठाऊक नसेल. युटूयब वर रोजचे काही तास खर्ची घालणायांनी त्याबद्दल ऐकलं असेल. जगभरात जवळपास सगळीकडेच सुरू असलेली छोटी मोठी युद्ध, निदर्षनं, उपलब्ध आणि उपयुक्त अशा कायदा नामक गोष्टीची आणि प्रत्येकाचे किमान त्याच्यापुरते गरजेचे हक्क वगरे यांची- अक्षरशः लागलेली वाट, यांचं प्रस्थापित माध्यमांना फटकून  वृत्तांकन हे व्हाईस न्यूज वाले करत असतात. या सगळ्याचा स्वतःला पटेल, मनाला जाणवेल, असा अर्थ कदाचित आज मलाही पूर्णपणे कळत नाही- हे माझ्याच जगण्याचं अपयश आहे. अगदी आजही आमच्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी निवडणुका वगरे जिंकणं हा इतपतंच, एकसंघ सामूहिक राष्ट्रीय कुतूहलाचा आणि साप्ताहिक एक्साईट्मेंटचा पोट्भर डोस आमच्यासाठी असतोय. आणखीन आठवडाभरात निवडणुकीचं कौतुक पूर्ण संपून अगदी नॉर्मल वाटावं असं आमचं दैनंदिन आयुष्य पुन्हा सुरू होईल. आमच्या देशात वरचेवर बॉंब पडत नाहीत की कुठे सिविल वॉर सुरू नाही. कुणाचं प्रचंड काही नुकसान होत नाही. आमचे प्रश्न त्यामानाने कितीतरी सोपे आहेत. थोड्याफ़ार इच्छाशक्तीच्या जोरावर ते सोडवणं अजिबातच कठीण नाही. या इतक्या प्रचंड सेफ़ वातावरणातून आम्ही उठून आलेले, म्हणूनही कदाचित, पण या सगळ्या गोष्टींशी पार आत्म्यापासून रिलेट करायला किती वेळ लागतोय? या सगळ्या गोष्टींनी माझ्या रोजच्या सोबतीच्या लोकांचीच जी अवस्था झालीये, त्याची मला नेमकी अशी- माझ्या मनाला जाळत जाईल अशी, साधी कल्पनाही करता येत नाही, हे किती वाईट. त्यामुळे आम्ही ज्या वातावरणात इतकी वर्षं जगत आलो, त्याचं छान वाटून घ्यावं, कौतुक वाटून घ्यावं,  की पराभव मान्य करायची मनाची तयारी सुरू करावी, याची संगतीही, मनात काही केल्या आज अजिबात घालता येत नाही.


ता.क. - ’इसिस’ ने सिरियात वगरे जे काही चालवलंय, त्याची फळं एक दिवस अख्ख्या जगाला नक्कीच चाखावी लागणारेत. का कुणास ठाऊक, पण इथे जर्मनीत या सगळ्याची भीती जास्त वाटतेय.