Disable right click

Thursday, 12 June 2014

पंचवीस नंबरची सिंफनी


मोझार्टच्या पंचवीस नंबरच्या सिंफनीला प्रत्येकाचंच काही ना काही देणं लागत असावं. त्यातल्या अवघ्या पाच सात सेकंदाच्या तुकड्याशी माझ्यासारख्या कित्येकांच्या नुकत्या कळू लागलेल्या वयाच्या आठवणी अजूनही इमान राखून असतील. पंचवीस नंबरची सिंफनी तिला मी आता म्हणायला लागलो. याआधी इतकी वर्ष निव्वळ टायटनची ट्यून म्हणूनच ती ठाऊक होती. आजही त्यातला तो पाच सात सेकंदाचा तुकडा वाजला की सोनेरी रंगाचं घड्याळंच आधी डोळ्यासमोर येतं आणि तिला टाळून तिथून निघणं दोन हजार टक्के अशक्य होऊन बसतं.

इकडे बऱ्याचश्या वर्गात कुणाला वाटलं तर वाजवावं म्हणून, पियानो वगरे असेच ठेवलेले आहेत. बरेचदा असं होतं की माझं अर्धं जर्मन लेक्चर झालेलं असतं आणि पलीकडच्या वर्गातून कुणीतरी पियानो वाजवायला लागतं. त्यानंतर कुणाचं वर्गात काय लक्ष लागणार? आजही ते ऐकत ऐकतच वर्गातून बाहेर आलो तेंव्हा वाजवणाऱ्याने पंचवीस नंबरची सिंफनी सुरू केली होती. मी तिथेच त्याच्या वर्गाबाहेर खोळंबलो; आणि जवळपास पुढचा तासभर तो वाजवत राहिला. अख्ख्या मजल्यावर त्याला आत आणि मला बाहेर सतवायला कुणी नव्हतं. दार उघडून त्याची तंद्री मधेच तोडायची अमानुष इच्छा काही मला झाली नाही. त्याचा चेहरा न पाहताच निघायचा तेंव्हा मी निघालो. आयतं मिळालं तरी ते पूर्ण घेववंत नाही, त्याचाही संकोच होतो शेवटी. ते तितकं कृतज्ञ वाटत असणं संपायच्या आत तिथून निघणं कधीही चांगलं. वाजवणारा 'तो' असावा की 'ती', याच्याही कल्पना मी रंगवलेल्या, आज मधेच खोकून त्याने त्याचंही उत्तर देऊन टाकलं.

एकदा अशीच माझी जर्मनची लहानशी परीक्षा सुरू होती. मला जर्मन शिकवणारी मुलगी खूप सुंदर आहे. युक्रेनियन आहे ती. अस्सल निळ्या डोळ्यांची आणि खूप शांत शांत. त्या दिवशी ती विलक्षण गोड दिसंत होती आणि बाहेर सगळं, भर उन्हाळ्यात ओतप्रोत भरून आलं होतं. मी अगदी खिडकीपाशी बसलो होतो. मी म्हणतच होतो की, हे सगळं कायच्या काय छान वाटायला लावणारं आहे आणि तितक्यात त्याने ते सगळं, जसंच्या तसं पियानोच्या आवाजाने झणझणून टाकलं.  काही जागच्या जागी पूर्ण भारून टाकणारे क्षण असतात. ते संपूच नयेत असं आपल्याला वाटायच्या आत ते संपलेलेही असतात.



: १३-०६-२०१४.

No comments:

Post a Comment