कॉलेजला जायच्या रस्त्याला लिश्तेनाऊ सोडलं की डावीकडे डोरेन्हेगन नावाचं गाव लागतं. रस्त्याला लागून दोन पिटुकल्या टेकडयांच्या उतारावर दूरवर पिवळी फुलं पसरलेली आणि मधल्या हिरवळीला ओलांडून त्याच्याही पलीकडे दिसणारं डोरेन्हेगन मधलं टुमदार चर्च आणि त्याच्या सभोवती बुटकी कौलारू घरं असलं विलक्षण काहीतरी मी रोज पहायचो. बहुदा सकाळी सगळं भरुन आलेलं असायचं आणि काळ्याभोर आकाशाच्या अखंड बॅकग्राउंडला हे सगळं- नाहीतर संध्याकाळच्या कोमट पिवळ्या कललेल्या उन्हात अजूनच चमकुन उठलेली ती पिवळीजर्द फुलं- असलं प्रचंड मोहमयी काहीतरी रोज येता जाता मनात रुतून बसायचं. मनातल्या मनात त्या एकाच विशिष्ट जागेवरून मी या दृष्याचे हजारो फोटो काढले. सायकल आली की कॅमेरा घेऊन एखाद्या शनिवारी ही सगळी हौस पूर्ण करायची असं जवळपास रोज स्वतः ला बजावत राहिलो. मग एक दिवस अचानक ती सगळी पिवळी फुलं रातोरात गायब झाली. ज्याचं शेत होतं त्याने त्याच्या व्यवहाराप्रमाणे कापायच्या दिवशी ती कापली. मग अलीकडे आणि पलीकडे एकच एक सबंध हिरवा रंग आणि त्यापलीकडे डोरेन्हेगन इतकंच शिल्लक राहिलं. उन्हाळ्याची सुरुवात ही अशी झाली आणि मी मग येताजाता जवळपास खिडकीच्या बाहेर बघणं सोडूनच दिलं.
: ०२-०६-२०१४.
: ०२-०६-२०१४.
No comments:
Post a Comment