Disable right click

Tuesday, 11 November 2014

शिशिरऋतूच्या..

अमूच्या मरण्याची बातमी नाही म्हणायला नको त्या वेळीच आली. शिशिरातल्या ओव्हरएक्स्पोस्ड रंगीबेरंगी उन्हात. मी पूर्ण एकटा असताना. ’दी टीथ फ़्रॉम हर स्माईल, अ ग्रीट फ़्रॉम हर बोन्स’ म्हटल्यावर मला भयंकर वाईट वाटलं. शिशिराने स्वतःचं अगदी पूरेपूर भांडवल करून घेतलं.  

हातातल्या डिजीटल पुस्तकात उगीच बोटांची हुळहूळ करत मी त्या एकांड्या स्टेशनात बसून होतो. कितीतरी दिवसांनी ऊन पडलं होतं. स्वच्छ कोरी करकरीत हवा. नेहमीसारखाच गोंधळ घालून, कितीतरी वेळ आधीच मी येऊन पोहोचलो होतो. सबंध स्टेशनात एकटाच. अमू मेल्यावर माझी मग पुढे तिथे बसून मुद्दामहून वाचण्याची इच्छाच मेली. त्या भर उन्हात एकटेपणाची रटरटणारी तेलकट जाणीव आतड्यात सकाळच्या अजीर्णासारखी सबंध गोळा झाली होती. अंगाखांद्यावर पानगळीचा जबरदस्त तांबडा पिवळा बहर घेऊन, पलीकडे कुंपणापाठी उभ्या असलेल्या दोन चार उंच झाडांवर नी त्यांच्या वाकड्या तिकड्या फांद्यांतून, निसटत्या दिसणाया एका शुभ्र घराच्या कौलांवर, माझ्या जुन्याच कुठल्यातरी आठवणीचा सोगा अडकून पडला होता. हा गोंधळ माझा बरेचदा उडतो. आपल्या आठवणींना कसला ना कसला, कुठलातरी अगम्य चेहरा असतो. अगदी तसलंच काहीतरी समोर आलं, की मग स्थलकालाचं भान पार बाराच्या भावात जातं. ती लालभडक पिकलेपणाची जाणीव अक्षरशः कुठेही होते. तो सगळा बहर अंगाखांद्यावर वागवणं बिलकूल सोपं नाही. गळतीच्या कुजू लागलेल्या पानांच्या हलक्याश्या स्वच्छ वासाची तंद्री मला त्याक्षणी जीवानिशी लागली. कितीतरी वेळ पानगळीचा तो सगळा पुर्वार्ध (आज आहे-उद्या नाही!) बघत मी घालवला.  

रात्री स्वप्नात, तिच्या बदामी डोळ्यांतून हसत, अनपेक्षितपणेच ती आली. कितीतरी दिवसांनी. मला मग किती बोलू नी किती नको असं झालं. मला तिला अमूबद्दल सांगायचं होतं. मला तिला सांगायचं होतं, की तिचं आवडतं पुस्तक शेवटी आता मी वाचायला घेतलंय. अमू नुकतीच मेलीये वगैरे. मग अमू म्हणते तसंच, वेळ आली की सांगायचं असतं ते सगळं तसंच राहून जातं. नको तेच सगळं बोललं जातं. स्वप्नात मला जबरदस्त इरेक्शन झालं. शिशिरातल्या त्या मऊसूत तशाच ओव्हरएक्स्पोस्ड रात्री ऋतूमासाचा साठलेला तो सगळा सिझनल थंड तांबडा बहर मला नागवून गळतीच्या त्या हलक्याश्या स्वच्छ वासांत झडून गेला. 

No comments:

Post a Comment