Disable right click

Wednesday, 6 May 2015

आमची जर्मन यत्ता कंची?

काही अगदी बेसिक कुतूहलं इथे आल्यापासूनच मनात होती. वरवर माणसं कशी दिसतात, कशी वागतात हा निरीक्षणाचा भाग झाला. ते चालूच राहतं. तशी ती मुळात का असतात, याचा विचार करता येणं आणि त्याची काही रिलेटीव उत्तरं शोधणं किंवा मिळणं, हे माझ्या दृष्टीने तितकंच महत्वाचं होतं आणि आहे. गेल्या टर्ममध्ये मला एक पेपर लिहायचा होता, आणि त्यानिमित्ताने जर्मन माणसं किती मुलभूत विचार करू शकतात, याची एक निव्वळ झलक मला मिळाली होती. आपल्या शिक्षणपद्धतीत विचार करण्याला (आयुष्यातली जवळपास २० वर्षे!) काडीचाही वाव नाही, हे मला इतक्या तीव्रतेने याआधी कधीही वाटलं नव्हतं. त्याची शिस्तशीर सवय लागावी लागते, आणि ती कधीपासून आणि कशी लागावी- याचा अचानक मला मिळालेला परिपाठ सांगावा, म्हणून हा लेख लिहीलाय. मात्र तितकाच माफक हेतू त्यामागे नक्कीच नाही. भारताबद्दलची इतरांची मतं, त्यांची शिक्षणपद्धती आणि भारताची प्रतिमा सध्या जगात कशी portray केली जातेय या सगळ्याबाबतच थोडंफार यात लिहिलंय.

वयोमानानुसार तुलना करायची झाली तर आपल्याकडच्या साधारण ’इयत्ता दहावीशी’ करता येईल. तर त्या वयाच्या जर्मन मुलांना ’इंग्रजी भाषा’ विषयात भारताविषयी साधारण १० पानांची Introductory theme आहे. त्या निव्वळ दहा पानांविषयी हा लेख आहे. माझ्या दृष्टीने त्यातले दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक म्हणजे ’भारत’ या थीमसाठी निवडलेला मजकूर, आणि दुसरा तितकाच महत्वाचा (हा विद्यार्थ्यांसाठीचा मजकूर असल्याने दिलेल्या मजकूरावर विचार करण्याची सोय आणि सुसंगत मोटिव्हेशन)- त्यावरचे मुलांनी सविस्तर उत्तरे देण्यासाठीचे प्रश्न. योगायोगाने दोनच दिवसांपूर्वी इथल्याच लोकल शाळेत आम्ही भारताविषयी एक छोटेखानी प्रेसेंटेशन देऊन आलो. मुळात भारताविषयी वय वर्षे सोळाच्या मुलांना, आणि खरं सांगायचं तर मी ओळखत असलेल्या कित्येक जर्मन लोकांना महात्मा गांधी, साप, हत्ती आणि सॉफ्टवेअर इंजीनियर्स यापलीकडे ठार काहीही ठाऊक नाही. तर तिथल्या एका शिक्षकांच्या आग्रहास्तव, थोडक्यात आम्हाला भारत आणि जर्मनीत काय फरक (culturely, socially, economically  वगरे) वाटला, इकड-तिकडच्या चांगल्या गोष्टी, चांगले-वाईट अनुभव आणि मग थोडक्यात भारताविषयी स्पेसिफीक असं काही, असं सगळं मुलांसमोर तासभर बोलायचं होतं. ते ठीकठाकंच झालं. भारत म्हटलं की विविधतेत एकता, वेगवेगळी लॅंड्स्केप्स, कपडे, भाषा, धर्म, खाणं-पिणं या इतपत गोष्टींविषयी बोलून भारताचं वेगळेपण गुंडाळलं जातं. आम्हीही थोडक्यात तेच केलं.  पण गंमत म्हणजे त्याच मुलांना ’इंग्रजी भाषा’ विषयात जो १० पानांचा धडा आहे (जो मी आज वाचला), तो पाहिल्यावर मला माझ्या प्रेसेंटेशनची कीव करावीशी वाटली. अर्थात आम्ही दिलेली भारताची प्राथमिक ओळखही तितकीच महत्वाची आहे, पण भारताविषयी बोलताना तो मजकूर किती अद्ययावत आणि नेमका असावा हे थोडक्यात मला आश्चर्यचकीत करणारं होतं. पुढचं सगळं वाचताना, हे इयत्ता दहावीच्या जर्मन पाठ्यपुस्तकातलं आहे, याची सतत जाणीव ठेवावी.


या दहा पानांत एकूण सहा वेगवेगळे लेख आहेत. मी त्यातल्या प्रत्येकाविषयी थोडक्यात लिहिणारे. सुरूवात भारताच्या साठाव्या स्वातंत्यदिनाचं औचित्य साधून विशेष आवृत्ती काढलेल्या विविध आंतरराष्ट्रीय मासिकांच्या (टाईम, जी२ उदाहरणार्थ) मुखपृष्ठांनी होते. त्यातल्या एकाचं टायटल 'This is the best place in the world to be born right now, The new India: a special issue' असं, तर दुसयाचं ’Why the world's biggest democracy is the next great economic superpower- and what it means for America' असं आहे. याशिवाय वेगवेगळ्या कालखंडात (पहिलं शतक ते २००१) वेगवेगळ्या चार लोकांनी नोंदवलेली त्यांची भारताबाबतची छोटेखानी निरिक्षणं ’some quotes about India'  म्हणून दिलीयेत. या निव्वळ इतक्या मजकुरावर चार अगदी बेसिक प्रश्न दिलेयत, जे प्रत्येकी एक अथवा दोन, प्रत्येक लेक्चरमध्ये अशा तर्हेने सोडवायचेयत (सोडवायचेत म्हणजे रुढार्थाने नव्हेत!). 

१. 'Look at the woman in the yellow sari. Imagine who she might be , where and how she might have lived her life, what she might have felt on her skin when the picture was taken and why she believes that India is the best place in the world to be born right now.
2. 'Examine and compare three covers. What picture of India do they convey? What symbols, motifs and language are used to bring about their message? (एकावर हत्ती आहे, दुसयावर कॉलसेंटर मध्ये वापरतात ते हेड्फोन्स घातलेली पारंपारिक भारतीय मुलगी आणि इंडिया राईट प्लेस म्हणणारी पिवळ्या साडीतली एक वृद्धा )
३. दिलेल्या quotes मधून कुठलं एक समान चित्रं (भारताचं) तुमच्या मनात उभं राहतं?त्यानंतर या प्रस्तावनापर पहिल्या लेखातच ’British rule in India- a timeline' म्हणून १६व्या शतकापासून ते स्वातंत्र्यापर्यंतच्या महत्वाच्या घटना नमूद केल्याएत.


दुसरा भाग ब्रिटीश राज, भारताची फाळणी इत्यादी गोष्टींबद्दल बोलतो. यातला पहिला उतारा हा बाप्सी सिधवाच्या ’Cracking India' (ज्यावर आपल्याकडे मीरा नायरने ’अर्थ’ काढला) पुस्तकातून घेतलाय. यात लाहोरमध्ये राहणाया आठ वर्षांच्या पारसी लेनीला जेंव्हा फाळणी होणार असं कळतं, तेंव्हा मुळात देश तुटतो म्हणजे तरी नक्की काय? म्हणजे मध्येच मोठ्ठे खंदक खोदून दोन देश वेगळे काढणार की काय वगरे असे प्रश्न पडलेले असतात. मग ती इतर कुणाकुणाबरोबर त्याबद्दल बोलते. या लेखावर दिलेले प्रश्न वाचून मी चाट पडलो. 

१. लेखात कुठकुठल्या पात्रांचा उल्लेख आलाय आणि फाळणीने त्यांचं नक्की काय केलं (how Partition affects them) ते लिहा.
2. Creative writing: Imagine you were a Hindu and your best friend a Muslim. After Partiton you live on separate sides of the border. Write a letter to express your feelings about Partition. Then read each other's texts and discuss their quality and content. (ज्यांनी मुळात फाळणी भोगली त्या भारत आणि पाकिस्तानातल्या एका तरी शाळेने एवढं सुंदर काम मुलांकडून काढून घायचं धाडस गेल्या साठ वर्षांत दाखवलं असेल का?)

दुसरा उतारा पंकज मिश्राचा २००७ मधल्या ’The New Yorker'  मधून घेण्यात आलेला ’Exit wounds- The legacy of Indian Partition' नावाचा आहे. या लेखाची सुरूवात फाळणीच्या आदल्या संध्याकाळी माऊंट्बॅटन त्यांच्या बायकोसोबत कसे ’My Favourite Brunette' पहात बसले होते आणि एकंदरीत ज्यांनी या देशाची फाळणी केली त्यांचा या सगळ्या घटनेप्रती कसा आणि किती Casual approach होता, हे अधोरेखीत केलंय. त्यानंतर निव्वळ पंधरा महिन्यात हा फाळणीचा आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न माऊंट्बॅटननी कसा झटपट तडीस लावायचा होता, ते येतं. त्यानंतर हा लेख कॉंग्रेसचा अखंड भारताचा आग्रह आणि मुस्लिम लीगचा वेगळं होण्याचा, आणि ऐन स्वातंत्र्याच्या दिवशी या लढ्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती, कशा त्या सोहळ्यालाच उपस्थित राहू शकल्या नव्ह्त्या (थोडक्यात 'Irony',  गांधीचं कलकत्यात असणं, जीना पाकिस्तानात) हे सगळं सांगतो. त्यानंतर ज्याच्यावर मुळात फाळणीची रेषा आखायची कामगिरी सोपवली होती त्या सिरील रेड्क्लिफने कसं प्रत्यक्षात पाहणी न करताच, आपल्या ऑफिसात बसून नकाशावर रेघा मारल्या, आणि परिणामसदृष्ट पुढे बांगलादेशची कशी निर्मिती झाली आणि जवळपास दोन दशकं ग्रामीण दारिद्र्य त्यांना कसं भोगावं लागलं, हे सगळं थोडक्या विस्तारात त्यात मांडलंय. त्यानंतर थोडक्यात फाळणीचं वर्णन (लाखो बेघर, हत्या, बलात्कार वगरे) आणि या आततायी निर्णयामुळे कसं ब्रिटीश राजने त्यांच्या ’नोबल एम्पायरच्या’ प्रतिमेलाच नख लावलंय, हे नमुद करणारा पॉल स्कॉटचा quote येतो. शेवटच्या परिच्छेदात फाळणीनंतर काही महिन्यांनी, ब्रिटीशांचे शत्रू ’हिंदूस्तान’ला ब्रिटीशांचे मित्र ’मुस्लिमांच्या’ विरोधात मदत केल्याबद्दल चर्चीलने माऊंट्बॅटनला कसं झापलं आणि पुढे कित्येक वर्षांनी लंडनवर मुस्लिमांनीच केलेला दहशतवादी हल्ला (पुन्हा ’Irony') असं करत हा लेख संपतो. यावरचे दिले गेलेले प्रश्न:
१. Summerise why Partition seemed inevitable to the people in powere in 1947.
२. मिश्रांच्या मते, ब्रिटीशांनी फाळणी करताना कुठल्या चुका केल्या? आणि त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काय परिणाम मिश्रांच्या मते झाले? Be careful to distinguish between fact and opinion.

तिसरा लेख सर्फ़राज मंझूर यांचा २००७ मध्ये 'The Guardian' मध्ये प्रकाशित झालेला 'Father to a nation, stranger to his son' या नावाचाए. सुरूवात गांधीच्या वाक्याचा उल्लेख करून होते ज्यात ते म्हणतात की आयुष्यात मी दोन व्यक्तींना समजावू शकलो नाही, एक जीना आणि दुसरा हरिलाल. मुळात फार काही गांधी हरिलाल संबंधांवर खोलात यात सांगितलेलं नाही, पण कुठल्या मुद्द्यांवर त्यांच्यात मतभेद होते, हरिलालने कसा मुस्लिम धर्म शेवटी स्वीकारला वगरे ते सगळं यात नमूद केलंय. ऍटन्बरोच्या ’गांधी’ ने गांधींची एक (चांगली) बाजू जगाला दाखवली, पण दुसरी (वाईट नव्हे!) बाजू दाखवणाया ’गांधी माय फादर’ नावाच्या सिनेमाबद्दल थोडक्यात हा लेख आहे. माझ्या दृष्टीने, गांधी म्हटल्यावर इतर बयाच भरपूर बोलल्या गेलेल्या गोष्टींना फाटा देऊन, फक्त गांधी-हरिलाल संबंध मजकूरासाठी निवडावा हे विशेष आहे. मुळातच गांधींबद्दल काहीही महत्त्वाचं ठाऊक नसणाया भारतीय मुलांसाठी गांधी-हरिलाल म्हणजे डोक्यावरून पाणी, आणि ठाऊक असलंच तर गांधीना खलनायकाच्या भूमिकेत ठेवायला प्रोत्साहित करणारं असंच फक्त. यावरचे प्रश्न-

१. Describe and evaluate the conflict between Gandhi and his eldest son
२. Discuss how you would present a figure of historical importance in a film.
३.  Write a scene for a film in which Harilal and his father  are having an arguement.

त्यानंतर एक छोटासा परिच्छेद जातव्यवस्थेबद्दल आणि सतीच्या प्रथेबद्दल वगरे थोडक्यात सांगतो. पण महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जातीचा अर्थ सांगून न थांबता, सध्याच्या औद्योगिकीकरणाच्या आणि शहरीकरणाच्या रेट्यात ही जातव्यवस्था कशी संपत चाललीये हेही नमूद करतो. या व्यतिरिक्त, अस्पृश्य आता स्वतःला दलित म्हणतात आणि अजूनही ते 'underprivileged'  आहेत असाही उल्लेख यात आहे!

तिसरा भाग हा सध्याच्या भारताबाबत वगरे थोडक्यात भाष्य करणारा आहे. यातला पहिला लेख 'Longing for the big cities' पेंग्विन इंडियाचे संस्थापक डेव्हिड दाविदार यांच्या 'The Solitude of Emperors'  या पुस्तकातून घेतलाय. लेखाच्या शीर्षकाचा आणि लेखाचा तसा काहीही संबंध नाही आणि एकूणात लेखही काही फार ग्रेट वगरे नाही, पण काही फार मूलभूत आणि गंमतीशीर निरीक्षणं मात्र त्यात आहेत. उदाहरणार्थ, ते म्हणतात की त्यांच्या आई-वडिलांच्या आयुष्यात फ़ार काही अपेक्षा, किंवा आपापल्या करिअर मध्ये फार काही मिळवावं वगरे असं काही नव्हतं. आधीच्या पिढीकडे काही निश्चित ध्येय होतं (स्वातंत्र्य) आणि पुढची पिढी बरीच महत्वाकांक्षी असताना, हे मात्र असेच कायम राहिले. लग्न करणं, आणि रुटीन आयुष्य जगणं हेच त्यांच्या आयुष्याचे महत्वाचे भाग होते, जो मला वाटतो की माझ्या वयाच्या कित्येकांचा कॉमन अनुभव असेल. या व्यतिरिक्त, त्यांच्या आई-वडिलांच इंटरकास्ट लग्न झालेलं, आणि त्या अनुशंगाने दोघांनाही सहन करावा लागलेला कौटुंबिक आणि सामाजिक ताप (आईच्या वडिलांनी मुलीशी लग्नानंतर बोलणं टाकणं इत्यादी) वगरे असं सगळं हा लेख सांगतो. शेवटच्या भागात केरळातल्या त्याच्या गावातून मुंबईत आल्यावर आसपासच्या सामाजिक परिस्थितीत झालेला बदल आणि त्याची उपयुक्तता वगरे लेखक सांगतो. यावरचे प्रश्नही तसे काही फार क्रिएटिव नाहीत.

१.  Compare the ways Vijay (मुख्य पात्र) presents his hometown on the one hand and Bombay on the other hand with regards to his feelings, hopes and expections.

दुसरा लेखही 'The Gateway of India' तसा मजकूराच्या दृष्टीने फार काही ग्रेट नाही. एक अमेरिकन बिसनेसमॅन काही आऊट्सोर्सिंगची डील्स नक्की करण्यासाठी मुंबईला येतो, ताजमहाल हॉटेलातल्या पॉश स्यूट मध्ये राहतो, पण त्याला मुंबई किंवा भारत आवडत असा अजिबात नाही. Gateway of India मात्र त्याच्या प्रेमाचा विषय आहे. यातलं एक वाक्य सगळ्या लेखाचा कंटेक्स्ट सांगायला पुरेसं आहे- ' India was a foreign country where he had been assigned to find outsourcing deals, not a place to enjoy but one to endure, like going down a dark hole to find jewels.' 

शेवटचा लेख 'The world as India' सूसान झोन्टागच्या  'At the same Time' मधून घेतलाय. यात भारतातल्या कॉल सेंटर कल्चरबद्दल विस्ताराने सांगितलंय. मुळात अनेक भाषा असलेल्या भरतात एक देशी भाषा (हिंदी) राष्ट्रभाषा म्हणून रुजवणं कसं कठीण आहे आणि इंग्रजीचा परदेशी पर्याय त्यामुळे कसा आपसूकच या देशाने निवडून, त्याचे उलटपक्षी काय फ़ायदे करून घेतलेयत, याबद्दल या लेखात बरंच काही लिहीलंय. कॉल सेंटर्मध्ये काम करणाया भारतीय मुलामुलींना या क्षेत्रात कराव्या लागणाया धडपडीबद्दल (अमेरिकन ऍक्सेंट, अमेरिकन जनरल नॉलेज, खोटी अमेरिकन आयडेंटीटी वगरे) बराच तपशील यात आहे. प्रश्न तितके काही मूलभूत नसले तरी एक टास्क मात्र छान आहे.

१.  Imagine you are a travel agents offereing a two-week cultural trip to India. Choose an Indian region. Research and collect suitable advertising material on what to see and do there, how to get around and where to stay. Prepare and present a program for the trip and compete with other groups in order to sell the package to a group of interested tourists. 


शेवटी एकंदरीत महत्वाचं- निवडलेले लेख ’भारताबद्दल’ म्हणून निव्वळ भारतीय लेखकांचे किंवा त्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेले नसून, आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या वार्ताहरांच्या (diverse opinions पुरता मर्यादित अर्थ, कोण किती ग्रेट लेखक वगरे हे इथे महत्वाचं नाही) लेखांचा समावेश त्यात आहे हे विशेष. दुसरी गोष्ट, जे काही निवडलंय ते जुन्या आणि नव्या भारताची स्पष्ट आणि खरी प्रतिमा मांडण्यापुरतं अगदी appropriate आणि पुरेसं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, या सगळ्याकडे बघण्याचा approach, आणि काही specific गोष्टींचा विचार करायला सोळा वर्षांच्या मुलांना प्रोत्साहीत करण्याचं  मुळात असलेलं motivation आणि त्याची जाणीव. या गोष्टींचा नेमका प्रभाव मुलांच्या विचारांवर आणि त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर पडल्यावाचून राहिल का? (!) 

ता.क. इकडे सगळीकडेच भारताच्या नकाशात भारत हा पाकव्याप्त काश्मीरच्या शिवायच दाखवतात, आम्हाला असा वरचा तुकडा तुटलेला भारत पहायची, दुर्दैवाने सवय नाही!

No comments:

Post a Comment