Disable right click

Wednesday, 6 May 2015

अठ्ठावीस मार्च दोन हजार पंधरा

आपलं आयुष्य नक्की सुरू कुठे होतं? खरंच आपण अगदी नेमके जन्मतो तेंव्हा? माझ्यापुरतं- ज्या बारीक सारीक अगदी जुन्यातल्या जुन्या गोष्टींच्या आठवणी अजूनही माझ्या डोक्यात अथवा डोळ्यांत शाबूत आहेत, तिथपासून मी माझ्या आयुष्याची सुरूवार ग्राह्य धरतो. त्याआधीचे आक्रस्ताळे हट्ट, घातलेले रंगीबेरंगी कपडे, अगदी रोजच्या रोज पाह्यलेली माणसं किंवा कुणाच्यातरी मांडीवर बसून पाह्यलेली नाटकं वगरे या माझ्यापुरत्या तरी परक्याच आठवणी आहेत. आपण चिक्कार रडत असलेले दिवस कुणाला तरी आठवतात का? त्या अर्थाने बालपण दोन-तीन वर्ष उशीराच सुरू झालंय माझं; आणि त्या मोजक्याच कशाबशा शाबूत राहिलेल्या आठवणींवर थेट हक्क सांगू शकणाया मोजक्या माणसांसोबत तुमचं ते थेंबाएवढं बालपण धडपडत शाबूत असतं. कुठपर्यंत?
.. 

हिवाळा संपत आला की मलाच माझी काहीशी अडचण व्हायला लागते. उगीच जडजड होतं सगळं आणि मग स्वतःलाच जागोजागी पार छाटून टाकावसं वाटतं. आपल्याच नको तितक्या वाढलेल्या जुन्याजीर्ण फांद्या, ना फुलणाया ना फळणाया. त्यांना उडवून लावलं की मग येणाया वसंतात, त्याच्या मऊसूत उन्हात, रेंगाळलेल्या गारव्यात नवीन कोंबांनीशी फुटायला आपण मोकळे. कसे अगदी सुटसुटीत. नवीन कोवळ्या कल्पना, नवीन कोवळे विचार. पण ते स्वतःलाच छाटायचं तंत्र कुणाला ठाऊकेय? आमच्या आजवरच्या सगळ्या प्रयत्नांची दुर्दैवी निष्पत्ती म्हणजे आमचा निव्वळ एक बोन्साय होऊ घातलाय. त्यामुळे या वसंताचं येणं आम्हाला जडंच जातं.
..

आयुष्य मुळातच रूथलेस असतं. तुमच्या आठवणी, तुमचे वसंत याच्याशी त्याला मुळातच काही घेणंदेणं नसतं. तुम्हाला जागोजागी स्पिरीट लावून (गार्गार वाटायला लावून) टचाटच सुया टोचायचं काम त्याच्या मर्जीने ते करतंच राहतं.  त्या त्या वयातले आपण आपापल्या कुवतीनुसार पुढल्या आयुष्यापुरते शिल्लक राहतो. वसंत ऋतूचं स्वागत कारायची या युरोपीयन लोकांची पद्धत अगदी जीवघेणी आहे. क्रानिच पक्षांनी आरडओरड करून एक-दोन संध्याकाळ दणदणून टाकल्या, की आपसूकच हिवाळ्यातली जाड्भरड जाकिटं कपाटात जाऊन मऊसूत स्वेटशर्ट्निशी वसंताचं स्वागत करायला सगळे तयार होतात. गोयापान मुलांच्या पायात स्केटस चढतात. वसंत ऋतू म्हणजे कठोर हिवाळ्यावरचा मुलायम उताराच. तो येतोच मुळी हळूवार. कोवळी कोवळी सुरेख उन्हं घेऊन. त्याचं स्वागत करायला गावातल्या आनंद मंगल कार्यालयात सगळे वसंतातल्या मैफीलीसाठी एकत्र जमतात. अगदी जवळपास प्रत्येकच गावात त्यांचा स्वतःचा म्युझिक बॅंड असतो. सगळेच असतात त्यात, लहनसहान मुलं-मुली, म्हातारे कोतारे. प्रत्येकजण काहीना काही वाजवतो. तर असे सगळे मिळून तीन तास वसंत ॠतुच्या स्वागतासाठी दणदणीत सिंफनीज वाजवतात. युरोपीयन संगीताची गंमत ही आहे की एकाच वेळी असे तीस चाळीस जणं वेगवेगळी वाद्यं घेऊन दणक्यात एखादं गाणं वाजवताना, तुम्हाला प्रश्न पडलेला असतो की, ती सिंफनी लिहिणायाने हे सगळं कसं काय कल्पिलेलं असेल? कशानंतर काय वाजवावं? किती वाजवावं? या सगळ्याचं एकूण वर्णन निव्वळ ’एलिगंट’ असंच करता येईल. एकदम भव्य काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर उभं करायची ताकद या संगीतात आहे. मला इथे नेमकं जाणवंत राहतं की, आपल्याकडचं संगीत ऐकताना ही भव्यता कुठेच नसते. आपलं संगीत माणसाला खोल त्याच्याच आत आत घेऊन जातं. दरवेळी त्या अर्ध्या पाऊण तासानंतर तुम्हाला टक्कं कळलेलं असतं की, काहीतरी तुमच्यातलं पार बदलून गेलंय. ही एवढी दोन टोकं संगीताची कशी काय अस्तित्वात असू शकतात? तर कालच्या त्या मैफीलीतला सगळ्यात गोड भाग म्हणजे, लहान मुलांचा छोटेखानी ऑर्केस्ट्रा. फारफार तर पाच किंवा सहा वर्षांच्या मुलामुलींनी एकत्र दोनचार दोनचार मिनीटांची अशी तीनेक गाणी वाजवली. त्यातलं एक म्हणजे जेम्स बॉंडचं थीम म्युझिक. अशा पार पारंपारिक मैफीलीत बाकीचे मोठे सगळे बेथोव्हन वगरे वाजवत असताना, सगळा रूपरंगच बदलून टाकायचा म्हणजे निव्वळ ग्रेटच.  

असा अठ्ठावीस मार्च. घड्याळ, रात्री मी झोपेत असताना एक तास आपोआप पुढे सरकलं. काळातली अंतरं अशी खरंच बदलतात? काळ असा खरंच साठवता येतो? म्हणतात बुवा.
..

मी माझ्या पिढीतल्या त्या एका दुर्दैवी घटकाचा भाग आहे ज्यांचं बालपण प्रचंड एकाकी गेलंय. किमान मला तरी असंच वाटंत आलंय. बदललेल्या कुटूंबव्यवस्थेची आणि पैसे कमवण्यासाठी कराव्या लागणाया इतरांच्या धडपडीची थेट झळ पोहोचलेली बहुतेक पहिली पिढी. शाळांच्या वेळा विचित्र, आई वडिलांच्या कामाच्या वेळा विचित्र आणि मैत्री होण्याचे अगदी सुरूवातीचे दिवस. माझ्या आठवणी इथून सुरू होतात. माझ्या सुदैवाने आई-वडिलांनी मला सांभाळण्यासाठी ज्यांच्या-ज्यांच्याकडे ठेवलं त्यांनी पार मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं. बेबिसिटींग नव्हेच. ठार आठ-नऊ महिन्यांचा असल्यापासून बहुतेक मी असा आई-वडिलांशिवाय राहत आलोय. डोंबिवलीत असताना आम्ही तळमजल्यावर राहायचो, आणि मला सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या जॉईंट कुटूंबात ठेऊन ते कामाला जायचे. त्यामुळे तिला मी आजही ’वरची आई’च म्हणतो. ब्याण्णव साली मुंबईत ऐन दंगल सुरू असताना आम्ही- मी तीन वर्षांचा होतो- डोंबिवली सोडलं आणि आताच्या जागेत म्हणजे कांदिवलीला राहायला आलो. पुढली कितीतरी वर्षं मी आमच्याच बिल्डींगमधल्या त्या वेळी एकट्याच राहणाया एका आजीआजोबांकडे रोज सकाळ दुपार राह्यलोय. आपण जगलेल्या हजारो दिवसांतले असे कितीसे आपल्या लक्षात राहतात? बाकीच्या दिवसांचं मग नेमकं काय होतं? आठवणाया चार-दोन गोष्टींपुरतंच आपलं बालपण आपल्यापाशी शिल्लक राहतं? 

त्यांच्याकडे मी नॉनव्हेज खायला शिकलो. दूधभाताचा तिटकारा मला तिथपासून यायला लागला. त्यांच्यासारखी फरसबीची छान बारीक चिरलेली भाजी आईला करता यायची नाही याचा मला जबरदस्त राग यायचा (अजूनही वाईट वाटतं). कागद चिकटवायला तो घाणेरडा कॅमलचा डिंकच लागतो असं नाही, शिजलेल्या भातानेही कागद व्यवस्थित चिकटतो हे मला त्यांच्यामुळे लक्षात राहिलं. दुपारच्या शाळेसाठी मला बसवर सोडाय-आणायला त्याच यायच्या. त्यांच्या गॅलरीत बसून माझे माझ्या बिल्डिंगमधले सकाळच्या शाळेला जाणारे थोडे माझ्याहून मोठे मित्र परत येताना पाहायचो. आपण कधी मोठे होणार असं पुढे कितीतरी वर्षं वाटंत राहिलं. तुमच्याहून मोठ्या मित्रांहून तुम्ही खरंतर कधीच मोठे होत नाही. त्यांच्या तीन खोल्यांमधल्या इतर दोन खोल्यांत गेल्याच मला का आठवत नाही? मी नेहमीच हॉल नाहीतर नक्कीच स्वैपाकघरात असत असलो असणार का? हॉलमध्ये एका व्यवस्थित टोचणाया जुनाट पिवळ्या चटईवर दुपारचं रेडिओवर लक्ष्मीकांत प्यारेलाल, लता मंगेशकर, महम्मद रफी नाहीतर ’और सुनिये अगला गाना मुकेश की आवाज में’ हे जवळपास मी रोज ऐकलंय. त्यामुळे माझ्या बाय डिफॉल्ट आजही आवडीची गाणी तीच आहेत. आज वीस वर्षांनंतरही ती ठराविक गाणी वाजली की आपण एकदम ते कायच्या काय लहान झाल्याचं फिलींग अंगावर कोसळतं. आमच्या तिथल्या हट्टांपायी आईला चिक्कार रडावं लागलेलं आहे. दुसया दिवशी येऊन आजोबा सॉरी म्हटले की पुन्हा आमचं तिथलं रूटीन सुरू. 


आजोबा आधीच गेलेले. काल आजीही गेल्या. प्रत्येक घराला एक विशिष्ट वास असतो. आता जाईन तेंव्हा भिंतीवर आजोबांच्याशेजारी आजींचाही छान हसतमुख फोटो लागलेला असेल, आणि त्या घराच्या त्या मला कित्येक वर्षं अगदी नेमक्या ठाऊक असलेल्या वासात अलीकडे कमी ऐकू येणाया आजी पुन्हा दिसणार नाहीत याची पोरकट जाणीव होईल, तेंव्हा आमचं बालपण ते सगळे संदर्भ टाकून मुक्त झालेलं असेल. एकेक फांद्या हळूवार कापायच्या, असंच ना?  

No comments:

Post a Comment