Disable right click

Monday, 2 June 2014

’सुरमयी शाम’ ऐकताना आज अचानक गेले बरेच दिवस सतत सोबत असणाया घाणेरड्या दमट करड्या रंगाची जबरदस्त जाणीव झाली. शांततेची किळस यावी असली काहीतरी परिस्थिती झालेली. भर उन्हाळ्यात दिवस-दिवस सूर्य दिसू नये? खाली सगळीकडे टवटवीत सुंदर हिरवा-पिवळा रंग पसरलेला असताना, सबंध आकाशाला करड्या रंगाचा फ़िल्टर लावल्यासारखा तोचतोचपणा सतत साचून राहिलेला. त्यात अवेळी गारा आणि पाऊस. (आपल्याला पाऊस जाम आवडतो तरी, मातीचा वासच पहिल्या फटक्यात येणार नसेल तर काय फायदा?)

इथे झालेली ही पहिली काही ठळक जाणीव. आपण भर रंगांतून, भर गोंगाटातून उठून आलेले. हजार तऱ्हेचे वास सतत घेत, हजार चवींची सवय असणारे, गर्दी वगरे आवडणारे. वाकडे तिकडे चालणारे. कुणाच्याही बापाला न भिणारे. त्यामुळे रोज नेमक्या त्याच वेळी त्याच बसला नेमका त्याच ठिकाणी सिग्नल लागायला लागल्याचा कंटाळा येण्याला काही पर्याय नाही. त्याचं कौतुक वाटायचे दिवस त्यामानाने बरेच लवकर सरले. एका रेषेत चालणाऱ्या गाड्या, जागच्या जागी रस्ता ओलांडणारी माणसं, एक मोट्ठं मशीनच असल्यासारखं सबंध शहर. त्यात डे-लाईट सेविंगचा राक्षस. पार आठ वाजेपर्यंत उजेड.

एखादी गोष्ट खरंतर स्वतंत्रपणे आवडायला हवी. तिथे तुलनेचा प्रश्न येऊच नये. पण हा भाग नुसता आवडण्याचा नसून, एखादी गोष्ट आवडण्यामागच्या प्रेरणेचा आहे. त्यामुळे संध्याकाळी मॉडेल कॉलनीकडे जाताना ब्रेमेन चौकात पावसाने आपल्याला बाईकवर अवेळी गाठल्यावरही होणारा तुफान आनंद आता कुठच्याकुठे राहिल्याचं दुःख, आत थोडंथोडं चुकचुकतं. पुण्यातल्या शक्य तितक्या टेकड्या चढून निवांत सुर्यास्त पाहण्याचे दिवस संपल्याची समज आता स्वतःला द्यावी लागते.

भरीस भर, करड्यावर थोडी काळ्याची दाट झाक चढली की मैसूरचीही जाम आठवण यायला लागते. ’टुंग टुंग दा सौंड’ कानभर वाजायला लागतो. रात्री अर्धवट झोपेत बॅंगलोरच्या घराची स्वप्नं पडतात. शेवटल्या काही दिवसांतला खुळचटपणा आठवतो. हे सगळं केलंच नसतं, तर आता या इथे आठवायला आणि बरं वाटून घ्यायला काही शिल्लकच राहिलं नसतं.

वाट्टेल ती येडझवेगिरी करायला नाही म्हटलं तरी इथे अजून तरी फाटतेच.

: ११-०४-२०१४.

No comments:

Post a Comment